पिंपरी – खाजगी सावकार गरजू नागरिकांकडून अवास्तव व्याज उकळत आहेत. व्याजाच्या पैशांची परतफेड करूनही नागरिकांकडून कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक पैसे उकळले जात आहेत. अशा खाजगी सावकारांच्या दबावाला बळी न पडता त्याबाबत पोलिसांकडे तक्रार द्या, असे आवाहन पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी केले आहे.
कोरोना साथीच्या काळात सन 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे आलेल्या जागतिक मंदीत उद्योगांना खीळ बसली. सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने नोकर कपात झाली. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली. गरजू नागरिकांना बेकायदेशीरपणे सावकारी करणा-या खाजगी सावकारांनी अवाजवी व्याजदराने पैसे दिले. घेतलेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे या सावकारांनी उकळले.
कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करूनही सावकार त्यांच्या मागे आणखी पैसे देण्याबाबत तगादा लावतात. अनेकदा धाकदपटशा करून, किमती वस्तू, दुचाकी वाहने, इलेक्ट्रिकवस्तू बळजबरीने उचलून आणल्या जातात. विविध प्रकारे सावकार लोकांची पिळवणूक करतात. असा एक प्रकार समोर आल्याने खंडणी विरोधी पथकाने निगडी पोलीस ठाण्यात खाजगी सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांना एखादी व्यक्ती अडवणूक, दमदाटी करून पैसे उकळत असेल तर नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल करावी. त्याबाबत काही अडचण असेल तर थेट पोलीस आयुक्त कार्यालयात संपर्क करावा. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन गैरकायदेशीर सावकारी करणा-यांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 तसेच अन्य कायद्याद्वारे गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले.