गावातीलच व्यक्ती पदावर नको : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन
वडापुरी – इंदापूर तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या वडापुरी गावात गावातील पदाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यात ग्रामसेवक नियुक्ती वरून चांगलाच वाद पेटला आहे, या वादामुळे अनेक दिवसांपासून गाव वेठीस धरले गेले आहे.
याबाबत माहिती अशी की, वडापुरी येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी शिवाजी फुगे यांच्या प्रशासकीय बदलीचे आदेश गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी काढले. त्यांच्या ठिकाणी वडापुरी गावातील रहिवासी असणारे नंदनकुमार चंदनशिवे यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व गटविकास अधिकारी परीट यांना लेखी निवेदन दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, वडापुरी ग्रामपंचायत येथे गावातील ग्रामसेवकाची नियुक्ती करू नये, गावातील व्यक्ती ग्रामसेवक म्हणून नियुक्त झाल्यास अनेक कामात अडथळा येऊ शकतो. गावगाड्यातील राजकारणाचा व गटातटाचा फटका गावातील विकास कामात होऊ शकतो. तसेच वडापुरी ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकाऱ्याची जागा असून त्या ठिकाणी ग्रामसेवकाची नियुक्ती करू नये.
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी श्री. फुगे यांनी त्वरित नंदकुमार चंदनशिवे यांच्याकडे दप्तर द्यावे अन्यथा पंचनामा करून चंदनशिवे यांच्याकडे दप्तर देण्यात यावे, असा लेखी आदेश काढला आहे. तर चंदनशिवे यांनी काढलेल्या मासिक मीटिंग व ग्रामसभेचा अजेंड्यावर सही करण्यास सरपंच संगीता तरंगे यांनी नकार दिला आहे. ग्रामसेवकांनी कार्यभार घेण्यावरून गावातील दोन्ही गटात संघर्ष दिसून येत असून वडापुरी ग्रामपंचायत येथील सात सदस्यांनी श्री फुगे यांनी चंदनशिवे यांच्याकडे त्वरित दप्तर द्यावे अन्यथा ग्रामपंचायतला टाळे ठोकू असे निवेदन गटविकास अधिकारी परीट यांना दिले आहे.
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट हे चंदनशिवे यांच्या नावासाठी आग्रही असून वडापुरी गावातील एक गट व सरपंच हे शिवाजी फुगे यांच्या नावासाठी आग्रही आहेत; परंतु या वादामुळे गावातील अनेक विकास कामे ठप्प झाली असून एकाच गावात सध्या दोन ग्रामसेवक कार्यरत असून दोघांनाही अधिकार नसल्याचे पाहायला मिळत आहे. वडापुरी येथे ग्रामसेवक म्हणून नियुक्त झालेले चंदनशिवे हे वडापुरी गावातील रहिवासी असून त्यांच्या वडिलांनी विकास सोसायटीची निवडणूक लढवली. त्यामुळे गावगाड्यातील राजकारणात सहभाग असलेला कुटुंबातील व्यक्ती गावात ग्रामसेवक नको, अशी भावना ग्रामस्थ व सत्ताधारी गट व्यक्त करत आहे.
…तर दोघेही नकोत
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी यामधील मार्ग काढून फुगे व चंदनशिवे यांच्या व्यतिरिक्त ग्रामविकास अधिकारी यांची निवड करावी अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे सरपंच व गटविकास अधिकारी यांच्यातील ग्रामसेवक नियुक्ती वरून वाद आणखी वाढणार.. ? की यावर तोडगा निघणार.. ! हे लवकरच कळेल.
ग्रामसेवकांची मनमानी
इंदापूर तालुक्यातील अनेक गावात ग्रामसेवकांची मनमानी दिसून येत असून ते अनेक दिवस ग्रामपंचायतीकडे फिरकत नाहीत. मनासारखी ग्रामपंचायत मिळाली तरच ते कार्यभार घेतात. पगार शासनाचा व ग्रामपंचायत आपल्या मनाप्रमाणे ही बाब खेदजनक असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.