वाघोली, (प्रतिनिधी)- प्रत्येकाला नळाच्या पाण्याचे कनेक्शन देण्याच्या उद्दिष्टाने केंद्राच्या वतीने जल जीवन मिशन सुरू करण्यात आली आहे. याच योजनेअंतर्गत जवळपास दोन कोटीहून अधिक निधी खर्चून होत असलेल्या पाण्याच्या योजनेत बांधण्यात करण्यात आलेली शिरसवडी येथील गावडेवाडी पाण्याची टाकी सध्या वादाच्या भोवर्यात अडकली आहे.
याबाबत ग्रामस्थ दत्तात्रय गावडे यांनी उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा पंचायत समिती हवेली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
दत्तात्रय गावडे यांनी दिलेल्या तक्रार निवेदनानुसार ग्रामपंचायत शिरसवडीच्या हद्दीतील मौजे गावडेवाडी येथे नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु असून, हे बांधकाम गावडेवाडी येथील अंगणवाडीसाठी खरेदी केलेल्या दोन गुंठे जागेत करणेत येत आहे.
ही बाब खूपच गंभीर आहे. अंगणवाडीसाठी खरेदी केलेल्या जागेत पाण्याच्या टाकीसोबत शेजारी वीजेची डीपी सुद्धा बसवलेली असून पावसाळ्यात येथे लहान मुलांच्या जीविताला देखील खूप मोठा धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावडेवाडी येथील नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम अवैध असून याबाबतीत कुठलीही बिले अदा करण्यात येऊ नयेत व या सदरील प्रकरणाशी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणेत यावी, अशी मागणी गावडे यांनी केली आहे.
अंगणवाडीसाठी देण्यात आलेली जागा आम्ही मोजून घेतली होती. सध्या अंगणवाडी लगत असणारी पाण्याची टाकी ही अंगणवाडीसाठी निर्धारित केलेल्या जागेत येत नाही. खासगी जागा मालकांकडून भविष्यात वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. यासाठी या जागेची शासकीय मोजणी करणे गरजेचे आहे. -बाळासाहेब गावडे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत शिरसवडी
ग्रामस्थांकडून बक्षीस पत्राने तत्कालीन सरपंच संदीप गोते यांनी अंगणवाडीसाठी दोन गुंठे जागा मिळवून त्यात अंगणवाडीच्या खोल्यांचे बांधकाम करण्यात आले होते. अंगणवाडीलगत पाण्याची टाकी बांधू नये, याबाबत संबंधित काम करणार्या ठेकेदारांच्या प्रतिनिधींना ग्रामपंचायतकडून कळवण्यात आले होते. तरी देखील काम करण्यात आले आहे.-प्रमोद गावडे, माजी चेअरमन अशोक विविध कार्यकारी संस्था
गावडेवाडी येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम ज्या जागेत करण्यात आले आहे. त्या जागेबाबत पाहणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित जागेची शासकीय मोजणी करून तसा अहवाल पंचायत समितीला त्वरित सादर करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. -कलिका खरात, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा हवेली