चंदीगड – ब्रिटनचे वादग्रस्त खासदार तनमनजीत सिंग ढेसी यांची पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अलिकडेच भेट घेतली होती. त्यावरून भारतीय जनता पक्षाने मान यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका केली आहे. त्या टीकेला आम आदमी पक्षानेही जशास तसे उत्तर दिले असून त्यांनी भाजप नेत्यांनी याच खासदारांची भेट घेतल्याचे फोटो जारी केले आहेत.
ज्यावेळी भाजपचे नेते खासदार ढेसी यांना भेटले होते त्यावेळी भाजपकडून कोणताच वाद का उपस्थित केला गेला नाही असा सवाल आम आदमी पक्षाने केला आहे. यातून भाजपचा दुटप्पीपणा उघड होतो, असे पंजाबमधील सत्ताधारी पक्षाने म्हटले आहे.
भाजप नेते आणि माजी लष्करप्रमुख जे जे सिंग यांनी भगवंत मान यांच्यावर ढेसी यांच्या भेटीवरून टीका केली होती.सदर ब्रिटीश खासदाराने फुटीरवादी विचारांना प्रोत्साहन देत भारत विरोधी विचारांचे समर्थन केले होते. त्यांच्या या धोरणांना आम आदमी पक्षाचे समर्थन आहे काय असा प्रश्नही भाजप नेते जे. जे. सिंग यांनी उपस्थित केला होता.
लेबर पार्टीचे खासदार असलेले ढेसी यांनी यापूर्वी भारत सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याबद्दल भारतावर टीका केली होती. त्यांनी गेल्या आठवड्यात आपचे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांच्यासह मुख्यमंत्री मान यांची येथे भेट घेतली होती.
भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, आपचे पंजाबचे नेते आणि प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी सोमवारी भाजपला विचारले की यापूर्वी भाजपचे नेते विजय सांपला यांच्यासह त्यांच्या काही नेत्यांनी ढेसी यांची भेट घेतली तेव्हा कोणतेही प्रश्न का उपस्थित केले नाहीत.
कांग म्हणाले की ढेसी यांच्या भेटीदरम्यान ब्रिटन मधील पंजाबी नागरीक आणि अनिवासी भारतीयांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली.आपचे नेते नील गर्ग यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर भाजप नेते सांपला आणि सोम प्रकाश यांच्यासह काही भाजप नेत्यांचे खासदार ढेसी यांच्या सोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे भाजपचीच या प्रकरणात गोची झाल्याचे दिसून येत आहे.