तमिळनाडू – तमिळनाडूमधील विश्वा दिनदयालन या युवा टेबल टेनिसपटूचा अपघाती मृत्यू झाला. रविवारी गुवहाटीवरून शिलॉंगला येत असताना अवघा 18 वर्षांचा विश्वा ज्या टॅक्सीने प्रवास करत होता त्या टॅक्सीचा अपघात झाला. यामध्येच विश्वाचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय टेबल टेनिस महासंघाने दिली आहे.
टेबल टेनिसपटूच्या आकस्मिक निधनाबद्दल केंद्रीय क्रिडा मंत्र्यांपासून तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. विश्वा हा त्याच्या तीन संघ सहकाऱ्यांसोबत 83 व्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी शिलॉंगला जात असतानाच हा अपघात झाला.
सोमवारपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. विश्वासोबत प्रवास करणारे रमेश संतोष कुमार, अभिनाष श्रीनिवासन आणि किशोर कुमार या तिघांना गंभीर दुखापत झाली असली तरी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मेघालय सरकारच्या मदतीने आयोजकांनी विश्वा आणि त्याच्या सहकाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले. विश्वा हा टेबल टेनिसमधील आघाडीचा खेळाडू होता. त्याने अनेक पदके आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या आहेत. तो ऑस्ट्रियामध्ये 27 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणार होता. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनीही विश्वाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.