श्रीरामपूर – श्रीरामपूर आणि बेलापूरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात फ्लेक्स लावण्यात आले. सदर फ्लेक्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात व तालुक्यात दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती. अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले.
सदर फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कांबळे यांनी शहर पोलिसांकडे केली. प्रत्येक निवडणुकीतील बदलत्या भूमिकेचा संदर्भ देत आ. कांबळे यांच्या विरोधात फलक शहरात पाच ते सहा प्रमुख ठिकाणी लावण्यात आले, त्याचप्रमाणे बेलापूरच्या चौकातही असाच फलक लावण्यात आला. सकाळी सोशल मीडियावर हे फलक व्हायरल झाले.
शहरातील कांबळे विरोधकांनी हा उद्योग केला असावा असा संशय घेत कांबळे व त्यांचे समर्थक पोलीस ठाण्यात गेले पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांची भेट घेऊन त्यांच्याकडे संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी नगरसेवक राजेश अलघ, शहर प्रमुख सचिन बडदे, सेनेचे डॉ. महेश शिरसागर, प्रवीण फरगडे आदी उपस्थित होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व फलक काढून टाकले. ज्या ठिकाणी हे फलक लावले होते त्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे त्यात फलक लावणारे दिसतात का यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करू असे पोलीस निरीक्षक बहिरट यांनी सांगितले.
शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल : खेवरे
आज गणपती विसर्जन असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही शिवसैनिक शांत आहोत. जर दोन दिवसांत नगरपालिका व पोलीस प्रशासनाने फ्लेक्स लावणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीविरुध्द काही कारवाई केली नाही तर आम्ही शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ, तो व्यक्ती भला आमच्यामधील असला तरीही त्याला सोडणार नाही.
श्रीरामपूर व बेलापूरमध्ये माझ्या विरोधात लावले गेलेले फ्लेक्स बोर्ड हे व्यक्ती द्वेषापोटी केलेले कृत्य आहे. आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सूचना केल्या आहेत.
आमदार भाऊसाहेब कांबळे