पुणे -कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. पुरेसा औषधसाठा, आवश्यक त्या सोयींनी युक्त रुग्णवाहिका, ऑक्सिजन युक्त बेड आदी आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना गतीने करा, अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत करोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी . डॉ. डी. बी.कदम यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत तसेच लसीकरणाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गृह विलगिकरण, ऑक्सिजन युक्त बेडवरील रुग्ण, उपलब्ध बेड यांसह ग्रामीण भागातील कोविड-19 सद्यस्थितीची माहिती देऊन उपाययोजनांची माहिती दिली.
पवार म्हणाले…
सीओईपी जम्बो कोविड सेंटर येथील बेडची संख्या आवश्यकतेनुसार 800 पर्यंत वाढवून हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करा
पिंपरी-चिंचवड मधील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करा.
हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांसाठी 50 टक्के राखीव बेड ठेवण्याची कार्यवाही करा.
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. गर्दी टाळावी, सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन करावे. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागांतील करोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. ग्रामीण भागात आवश्यक वैद्यकीय सुविधा, सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका, पुरेसे बेड उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे.
– दिलीप वळसे-पाटील, कामगार मंत्री.
करोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी आणि लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. लग्न समारंभ कमीतकमी संख्येत व्हावेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आरोग्य व्यवस्था सक्षम करून बेड व्यवस्थापन सुरळीत ठेवावे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे