पुणे – राज्यसरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल केंद्र सरकारतर्फे देखील संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉक डाऊन करत असल्याचे जाहीर करण्यात आलंय. दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या कठोर उपाययोजना अत्यंत आवश्यक असल्या तरी उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र या बंदीमुळे अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळतंय. राज्यामध्ये पेट्रोल व डिझेल विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांना आपली दैनंदिन कामं करणं कठीण झालं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनी ग्रामीण भागात पेट्रोल व डिझेलची विक्री सुरु ठेवण्यात यावी अशी मागणी केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून त्यांनी शेतीशी निगडित कामं सुरु राहावीत यासाठी ही मागणी करत असल्याचं म्हंटलं आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर ते लिहतात, “शेतकऱ्यांना भर उन्हात /रात्री-अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावं लागतं. भाजीपाला, धान्य, चाऱ्याची वाहतूक, नांगरट व ट्रॅक्टरवरील मळणी यासाठीही डिझेल लागतं. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरु ठेवावं, ही विनंती. @OfficeofUT @AjitPawarSpeaks”