महापालिका प्रशासनाच्या जाचक अटींमुळे संपूर्ण प्रक्रिया अडचणीत
पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी वर्ग-1 च्या 126 पदांसह वर्ग-2 आणि 3 मधील डॉक्टरांची सुमारे 1,100 पदे भरण्यात येत आहेत. मात्र, महापालिकेने अचानक नियुक्तीच्या अटींमध्ये बदल केल्याने या नवीन अटीनुसार एकही डॉक्टर सेवेत येण्यास तयार नाहीत. त्यामुळे नव्याने जाहिरात काढून ही पदभरती करावी लागण्याची शक्यता आहे.
शहरात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच प्रशासनाच्या गोंधळ समोर आला आहे. या तांत्रिक अडचणीमुळे वैद्यकीय सेवेसाठी पुरेसे कर्मचारी नेमण्यात अडचण निर्माण झाली आहे.करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागात 1,100 पदांच्या नियुक्तीसाठी राज्यशासनाने मान्यता दिली होती. यानंतर सामान्य प्रशासन विभागाने पावले उचलली. पालिका या जागा कायमस्वरूपी तत्वावर भरणार असल्याची जाहिरात देण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज आले. त्यानंतर कागदपत्रे पूर्तता आणि मुलाखती झाल्या. तोपर्यंत या उमेदवारांना कायमस्वरूपी घेणार असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, यातील अनेक पदांना मुख्यसभेच्या मान्यतेशिवाय नियुक्ती देता येत नसल्याचे प्रशासनाच्या आयत्यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे नियुक्तीपत्रे देताना प्रशासनाने आयत्यावेळी यात बदल करत तीन महिन्यांसाठी ही नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याबाबत पत्रही डॉक्टरांना देण्यास सुरूवात केली. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी जाहिरातीतील अट दाखवत नियुक्ती स्वीकारण्यास नकार दिला आहे.
आम्ही वेळ का घालवायचा?
महापालिकेच्या या कारभारावर उमेदवार डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. तीन महिन्यांसाठी नियुक्ती द्यायची होती, तर त्यांनी तशी स्पष्ट जाहिरात काढायची होती. कायमस्वरूपी पदासाठी जाहिरात असल्याने आम्ही आलो आहोत. त्यामुळे पालिकेने पुन्हा स्वतंत्र जाहिरात काढावी. त्यातून जे तयार असतील ते सेवेत जातील. आम्ही दोन महिने उगाच आमचा वेळ वाया कशाला घालवायचा? असा सवाल काही डॉक्टर उपस्थित करत आहेत.