मुंबईतून आलेल्या वृद्धाचा भालवडीत मृत्यू

गोंदवले  (प्रतिनिधी) – माण तालुक्यातील भालवडी येथे आलेल्या एका कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तीचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच मुंबईहुन आलेल्या व्यक्तीला प्रशासनाने होम क्वारंटाईन केले होते. मात्र गावी आल्यानंतर अचानक मृत्यू झाल्याने स्वॅब तपासणीसाठी सदरचा मृतदेह फलटण येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य आधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी दिली.

भालवडी येथील वृद्ध पती पत्नी त्यांचा मुलगा व सून असे चार जणांचे कुटुंब मुंबई येथे रहात होते. शुक्रवारी 22 तारखेला चार जणांचे हे कुटूंब भालवडी या मूळ गावी आले होते. मुंबई येथून आल्याने प्रशासनाने संबंधित कुटुंबातील सर्व व्यक्तींना होम क्वारंटाईन केले होते. मात्र गावी आल्यानंतर दोनच दिवसात यातील वृद्ध व्यक्तीचा रविवारी अचानक मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मयत व्यक्ती तीन महिन्यापासून काविळीच्या आजाराने त्रस्त होती, तसेच सततच्या आजारामुळे गेल्या आठवड्याभरापासून पोटात पुरेसा आहार न घेतल्याने प्रकृती खालावल्याने मृत्यू झाल्याचे मयत व्यक्तीच्या मुलाने ग्रामस्थांना सांगितले.

दरम्यान मुंबईहून आलेल्या वृद्धाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती सरपंच सुनीता पवार व पोलीस पाटील देवेंद्र बनसोडे यांनी आरोग्य विभागास दिली. त्यामुळे मयत व्यक्ती मुंबईहुन आल्याने सदरच्या व्यक्तीस कोरोना लक्षणे आहेत किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती माण तालुका आरोग्य आधिकारी डॉ. कोडलकर यांनी दिली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवरघटनेमुळे भालवडी परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत असून नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.