शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) आणि या परिसरातील वेळ नदीला प्रदूषणाचा पडलेला विळखा लक्षात घेऊन तातडीने घरगुती सांडपाणी व घनकऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शिरूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना
दिले आहेत.
शिक्रापूर परिसरातील प्रदुषणाबाबत तळेगाव ढमढेरे येथील सतीश ढमढेरे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तातडीने या परिसरातील प्रदुषणाची पाहणी केली होती.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केल्यानंतर या अहवालाची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी शिरूर गटविकास अधिकाऱ्यांना लेखी आदेश काढून प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने घरगुती घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारावेत अशी समज दिली असून दहा दिवसांत कार्यवाही अहवाल देण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी आदेशात शिक्रापूर व आजूबाजूच्या गावांचे सांडपाणी तसेच घनकचऱ्याची विल्हेवाट करत नसल्याबाबत विचारणा केली आहे.
शिक्रापूर येथील प्रदुषणाबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता शिक्रापूर गावातून निर्माण होणाऱ्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे हे सांडपाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता वेळ नदीमध्ये सोडले जात असल्याचे
दिसून आले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या पत्रानुसार दोन दिवसांपूर्वी शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायतींना कचरा व्यवस्थापन प्रकल्प चालू करण्याचे आदेश दिले आहेत.
विजयसिंह नलावडे, गट विकास अधिकारी