2018 मध्ये करण्यात आली मुद्रांक कायद्यात सुधारणा
शहरातील काही भागांतील घरांचे दर होणार कमी
पुणे – रेडी रेकनर अर्थात जमिनीच्या वार्षिक बाजारमूल्य कमी करण्याची तरतूद मुद्रांक कायद्यात 2018 मध्ये करण्यात आली आहे. यानुसार ज्या भागात प्रत्यक्ष रेडी रेकनरचे दर आणि खरेदी-विक्रीचे दर यामध्ये तफावत आहे, या परिसरातील रेडी रेकनरचे दर पहिल्यांदाच कमी करण्यात येणार आहे. यंदा पुणे शहरात सरसकट दरवाढ न करता काही परिसरातील रेडी रेकनरचे दर कमी केले जाणार आहेत. यामुळे घर खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्यात दरवर्षी दि. 1 एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू केले जातात. या दरानुसार जमीन, सदनिका, आणि दुकाने आदी मालमत्तांचे दर ठरतात. मागील काही वर्षे अपवाद वगळता रेडी रेकनरच्या दरात दरवर्षी वाढ झाली आहे. त्यामुळे विविध संघटनांकडून रेडी रेकनरचे दर कमी करण्याची मागणी होत होती. मात्र, मुद्रांक कायद्यात रेडी रेकनरचे दर कमी करण्याची तरतूद नव्हती.
त्यामुळे दर “जैसे थे’ ठेवण्याचे अथवा त्यामध्ये काही प्रमाणात वाढ करणे असे दोन पर्याय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे होते. 2018 मध्ये मुद्रांक कायद्यात बदल करून रेडीरेकनरचे दर कमी करण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली. शासनाने रेडी रेकनरमध्ये दर कमी करण्याची तरतूद करून सकारात्मक पाऊल उचलले. मात्र, करोना काळात या तरतुदींची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यंदा मात्र रेडी रेकनरचे दर अचूक करण्यावर नोंदणी व मुद्रांक विभागाने भर दिला आहे.
———
उलाढाल पाहून निर्णय
गेल्या दोन ते तीन वर्षांत ज्या भागांत घर, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत, त्यांची तपासणी करण्यात आली. यात जेथे वाढ झालेली नाही, अशा भागांतील दर कमी करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार तर ज्या भागात मोठी वाढ होत आहे, अशाच भागात काही प्रमाणात दरवाढ प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
————–
रेडी रेकनर ठरवताना या घटकांचा विचार
वर्षभरात नोंदविण्यात आलेल्या खरेदी-विक्रीची व्यवहारांची माहिती “एनआयसी’ अर्थात राष्ट्रीय सूचना केंद्राकडून मागवली जाते. इंटरनेट आणि जाहिरातीतील बांधकामांचे दर आदी सर्व माहिती संकलित करून खरेदी-विक्री व्यवहारातील मालमत्तेचे स्थान, प्रकार, व्यवहारातील प्रत्यक्ष दर रेडी रेकनरचा दर, विकास क्षमता यासर्व बाबी विचारात घेऊन रेडी रेकनरचे दर निश्चित करण्यात येतात. त्याचबरोबर वास्तुप्रदर्शन व विविध प्रकल्पांना भेटी, दस्तनोंदणी संबंधित संघटना, बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना, व्यावसायिक यांच्यासह बैठका घेऊन सविस्तर चर्चा केली जाते. महसूल यंत्रणेकडून सूचना मागविल्या जातात. या बाबींचा विचार रेडी रेकनरचे दर ठरविताना केला जातो.