श्रीनगर – यंदाची अमरनाथ यात्रा येत्या 30 जूनपासून सुरू होणार आहे. ही यात्रा जवळपास 43 दिवस चालणार असून परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ती संपणार आहे. यावेळी अमरनाथ यात्रा लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या कार्यालयातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यात्रामार्गातील प्रवासादरम्यान भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान देशातील कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथची यात्रा रद्द करण्यात आली होती. कोरोनाच्या उदेकामुळे गेल्या दोन वर्षांत केवळ प्रतिकात्मक स्वरुपात यात्रा पाळण्यात आली होती.
अमरनाथ यात्रेसाठी येणाऱया यात्रेकरूंची ऑनलाईन नोंदणी एप्रिलपासून सुरू होणार आहे. श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने अलीकडेच यासंबंधीची घोषणा केली होती. एका दिवसात केवळ 20 हजार नोंदणी होणार असल्याचे श्राईन बोर्डाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ऑनलाईन नोंदणीबरोबरच प्रवासाच्या दिवशी काउंटरवर जाऊनही नोंदणी करता येईल, अशी माहिती श्राईन बोर्डाने दिली आहे.