पुणे -करोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांत करार अथवा तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्त केलेल्या सहायक प्राध्यापकांना विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
या प्राध्यापकांची मुदत संपली होती. मात्र, त्यांना नवीन नियुक्तीची प्रक्रिया करून पदे भरेपर्यंत या सहायक प्राध्यापकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. विभागामार्फत 11 महिन्यांच्या कालावधीसाठी सहायक प्राध्यापकांची करार अथवा तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्त केले जातात. या प्राध्यापकांची मुदत 31 मे रोजी संपली आहे.
मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे शैक्षणिक सत्र पुढे सरकले आहे. त्यामुळे अनेक विभागांमध्ये शिक्षकांचे अध्यापन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परीक्षा व मूल्यमापनाची प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. अशा स्थितीमध्ये तात्पुरत्या अथवा करार पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या सहायक प्राध्यापकांची मुदत संपल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होणार असल्याचे दिसून येत होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने या प्राध्यापकांना मुदतवाढ देण्यात आल्याचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी शुक्रवारी काढले.
तथापि, विशेष बाब म्हणून 31 जुलै 2021 पर्यंत अथवा शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी मंजूर करण्यात आलेल्या सहायक प्राध्यापकांची पदे भरण्याची रितसर प्रक्रियाकरून पदे भरेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, दि. 31 जुलै 2021 नंतर नवीन नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही डॉ. पवार यांनी विभागप्रमुखांना सूचित केले आहे.