अतुल भोसले यांच्यासाठी माथाडी नेत्यांचे आवाहन
कराड – अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी मुंबईतील माथाडी नेते आणि व्यापारी एकवटले आहेत. या माथाडी नेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी कराड दक्षिण मतदारसंघात दौरा केला. अतुलबाबांसारख्या आदर्श आमदारांची या मतदारसंघाला गरज असून या कर्तबगार युवा नेतृत्वाला सर्वांनी विजयी करावे, असे आवाहन मतदारांना केले आहे.
रोजगाराच्या निमित्ताने कराड दक्षिणमधील अनेक मतदार मुंबईत स्थलांतरित झाले आहेत. यातील बहुतांश लोक हे माथाडी कामगार तसेच भाजीपाला मार्केट व मच्छी मार्केटमध्ये कार्यरत आहेत. कराड दक्षिणमधून पूर्वीच स्थलांतरित झालेले काही लोक आता तिथे मोठे व्यापारी बनले असून, त्यांनी आपला उद्योग विस्तारला आहे.
यावेळी या माथाडी नेत्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना जाहीर पाठिंबा देत, त्यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले आहे. गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार युनियनचे नेते बळवंतराव पवार, मुंबई फ्रेश फिश मार्केट व्यापारी असोसिएशनचे फारुख शेठ, हनिफ शेठ, फिरोज शेठ, अबू शेठ, हाजी शेठ, मुंबई व्यापारी संघटनेचे आबासो जाधव, स्वप्नील जाधव, राजाराम पाटील, एकनाथ तांबवेकर, प्रकाश ताटे, दिलीप कुऱ्हाडे, रवींद्र शेवाळे, पांडुरंग जाधव, जयप्रकाश माने, अमित शेटे, पांडुरंग शेटे, गिरीराज देसाई, सुधीर यादव, काशिनाथ ताटे, निवासराव जाधव या मान्यवरांनी कराड दक्षिणमध्ये तळ ठोकून प्रचारात आघाडी घेतली आहे.
त्यांनी येणपे, घोगाव, येळगाव, महारूगडेवाडी, जिंती, घारेवाडी, कोळेवाडी, बामणवाडी, तारुख या गावांमध्ये घरभेटी, बैठक आणि जाहीर सभांच्या माध्यमातून अतुल भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले. बळवंतराव पवार म्हणाले, अतुल भोसले हे उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असून, आमदार नसतानाही त्यांनी कराड दक्षिणमध्ये भाजप सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे.
फक्त कराड दक्षिणच नव्हे तर पंढरपुरातही त्यांनी आमूलाग्र बदल आणि विकासकार्य करून दाखविले आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या त्यांच्या शब्दामुळेच मुंबईतील व्यापाऱ्यांचा मार्केटचा प्रश्नही मार्गी लागला आहे. असे धडाडीचे नेतृत्व कराड दक्षिणेला मिळाल्यास या भागाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.