उदयनराजे व धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ रॅलीने रंगत
कराड – मोदीजींनी दिल्ली जिंकली, आता महाराष्ट्रही जिंकूया. राज्याला समृध्द करायला कमळ-धनुष्य निवडू या, असं म्हणत आज कराड उत्तर मतदार संघात भगवे वादळ उठले. विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी उदयनराजे भोसले व धैर्यशील कदम यांना निवडून देण्याचा निर्धार आज 51 गावांतील मोटार रॅलीच्यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना, रिपाई, रासप, रयतक्रांती, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले व कराड उत्तर विधानसभेचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी प्रचारार्थ सातारा, कोरेगाव, खटाव व कराड या तालुक्यांतील सुमारे 51 गावांतून झंझावाती दौरा केला. सकाळी नऊ वाजता सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) येथून मोटरकार रॅलीला सुरुवात झाली.
मिलिटरी अपशिंगे येथे ग्रामदैवताचे दर्शन घेऊन रॅलीस सुरुवात झाली. भाजपाच्या नव्या युगाला छत्रपतींचा आशिर्वाद, एकमुखाने चला देऊया आता मोदीजींना साथ, हे स्पिकरवर सर्वत्र वाजणारे गाणे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. लहान-मोठ्या गावांतून नागरिकांचे स्वागत स्विकारत राष्ट्रीय महामार्गावरुन अतित, उंब्रज, शिवडे, मसूर, वाठार, आर्वी, नागझरी, पुसेसावळी, गोरेगाव वांगी, राजाचे कुर्ले, करवडी, ओगलेवाडी, शामगाव, विरवडे आदी सुमारे 51 गावांतून ही रॅली कोपर्डे हवेली, ता. कराड येथे आल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली.
या रॅलीमध्ये जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते भिमरावदादा पाटील, सुनील काटकर, भाजपचे उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, समृद्धी जाधव, मधुकर पाटील, संतोष गुजर, सुरेश यादव, पवन निकम, बंडा पैलवान, पै. संतोष घाडगे, राहुल गायकवाड, हिंदुराव यादव तसेच ठिकठिकाणचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, कराड उत्तरच्या विकासासाठी अनमोल योगदान देणारे लोकनेते स्वर्गीय बाबासाहेब चोरेकर यांच्या 27 व्या पुण्यतिथीनिमित्त चोरे येथे धैर्यशील कदम, सत्वशील कदम, वर्धन ऍग्रोचे संचालक यशवंत चव्हाण, राहुल थोरात यांनी समाधीस्थळी अभिवादन करुन आदरांजली वाहिली.