अहमदाबाद – कॉंग्रेसने आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपली स्ट्रॅटेजी निश्चीत केली असून त्यांनी पंतप्रधान मोदींऐवजी गुजरातमधील भाजपच्या कमकुवत नेतृत्वालाच टार्गेट करण्याचे ठरवले आहे. या निवडणुकीला कॉंग्रेसविरुद्ध मोदी असे स्वरूप येऊ न देता गुजरातमधील भाजपचे जे कमकुवत नेतृत्व आहे त्याविरोधात मोठा लढा उभारण्याची योजना कॉंग्रेसने आखली आहे. गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हे आहेत; पण त्यांची कामगीरी सुमार दर्जाची असल्याने आणि ते केवळ मोदी-शहा यांचीच कळसुत्री बाहुली असल्याप्रमाणे वागत असल्यानेच त्यांच्याविषयी जनतेत नाराजी आहे. त्याचेच भांडवल करण्याची कॉंग्रेसची ही योजना आहे.
या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करण्याचे आपले जुने धोरणच चालू ठेवण्याची कॉंग्रेसने भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याऐवजी पक्षाने सामूहिक नेतृत्वाच्या आधारे ही निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.
गुजरात विधानसभा 182 सदस्यांची आहे आणि या राज्यात गेली 24 वर्ष भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे भाजप राजवटीविषयी नैसर्गिकपणे अँटि इन्कबन्सी फॅक्टर कार्यरत राहणार आहे. त्याचा अधिकाधिक लाभ उठवण्याचाही प्रयत्न कॉंग्रेसकडून होईल अशी अपेक्षा आहे.
प्रियंका गांधी यांच्यासह काही प्रमुख नेत्यांचा समावेश असलेल्या कॉंग्रेसच्या टास्क फोर्सने या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीत गुजरातमधील नेत्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखण्यासाठी बैठक घेतली होती. त्यात हा निर्णय झाला आहे. टास्क फोर्समध्ये ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, मुकुल वासनिक, के सी वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांचाही समावेश आहे. गुजरात कॉंग्रेसचे प्रभारी रघु शर्मा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर, विरोधी पक्षनेते सुखराम राठवा, गुजरात कॉंग्रेसचे दोन माजी अध्यक्ष – अर्जुन मोधवाडिया आणि अमित चावडा आणि प्रवक्ते मनीष दोशी या बैठकीत सहभागी झाले होते.
पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, गुजरातच्या निवडणुका केंद्र सरकार स्थापन करण्यासाठी किंवा पंतप्रधान निवडण्यासाठी नसल्यामुळे या निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस यांच्यातील लढतीचे स्वरूप येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुका गुजरातसाठी आहेत आणि आमची लढाई मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याविरुद्ध आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
भाजपसाठी पीएम मोदी हे त्याचे ट्रम्प कार्ड आहे आणि ते त्यांच्या नावावर मते मागतील. त्यांच्याकडे राज्य पातळीवर कोणताही दबदबा असलेला नेता नाही, त्यामुळे भाजपकडून निवडणुकीला मोदीविरुद्ध कॉंग्रेसच्या लढतीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ही लढाई मोदींना सत्तेवर बसवण्याची नाही, भाजपने गेल्या 24 वर्षाच्या काळात गुजरातमध्ये अत्यंत बेशिस्त आणि अंदाधुंद कारभार केला आहे. त्यावर हल्लाबोल करून प्रचाराचे तंत्र अंमलात आणण्याचे पक्षाच्या टास्कफोर्सने ठरवले आहे.
हायकमांडच्या चौकशीच्या आदेशावर अशोक चव्हाणांची स्पष्ट शब्दात नाराजी; म्हणाले…