नवी दिल्ली (वंदना बर्वे) – विधान परिषदेची निवडणूक आणि विश्वास दर्शक ठरावातील कॉंग्रेस आमदारांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी मोहन प्रकाश यांना महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठविले आहे. कॉंग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमध्ये पक्षाच्या आमदारांच्या भूमिकेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोनिया गांधी यांनी ही जबाबदारी राज्याचे माजी प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावर सोपविली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला होता. कॉंग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटींग केले. योग्य नियोजन केले गेले असते हांडोरे विजयी झाले असते. याशिवाय, विश्वास दर्शक ठरावाच्यावेळी कॉंग्रेसचे मंत्री आणि काही आमदार अनुपस्थिती राहिले होते.
यामुळे हायकमांडच्या तळपायातील आग मस्तकात गेली आहे. कॉंग्रेसचे नेते, मंत्री आणि आमदारांच्या भूमिकेची चौकरशी करण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला आहे. मोहन प्रकाश यांनी बरेच वर्षे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम केले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणाशी ते परिचित आहेत.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी कॉंग्रेस अध्यक्षा यांची भेट घेवून क्रॉस व्होटींगची माहिती दिली. याशिवाय, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी क्रॉस व्होटींग करणारे आणि विश्वास दर्शक ठराव्यावेळी सभागृहात उपस्थित न राहणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मोहन प्रकाश यांनी आपला अहवाल लवकरात लवकर हायकमांडकडे सादर करायचा आहे.