भोपाळ – मध्यप्रदेशात कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा पंधराशे रूपयांची मदत देण्यात येईल आणि सवलतींच्या दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा त्या पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली आहे.
कमलनाथ म्हणाले की कॉंग्रेसने कर्नाटकात महिलांसाठी दरमहा दोन हजार रूपये देण्याची योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच धर्तीवर आम्ही मध्यप्रदेशातही नारी सन्मान योजना लागू करणार आहोत. भाजपने लाडली बेहना योजना आखली असून त्यात ते दरमहा एक हजार रूपयांची मदत महिलांना देणार आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून कॉंग्रेसने या योजनेची घोषणा केली आहे.
कमलनाथ म्हणाले की सध्या प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे महिलांना घर चालवणे जिकीरीचे बनले आहे. अशा स्थितीत त्यांना मदत करणे हे आमच्या सरकारचे काम असेल. सध्या गॅस सिलिंडरचा दरही 1100 रूपयांच्यावर गेला आहे. कोणालाच तो परवडत नाही. म्हणून आम्ही मध्यप्रदेशात पाचशे रूपयांना सिलिंडर देऊ असे कमलनाथ यांनी सांगितले.
हे दोन्ही लाभ मध्यप्रदेशातील प्रत्येक घराला मिळतील याचीही आमचे सरकार दक्षता घेईल असे ते म्हणाले. त्यांच्या या घोषणांवर टीका करताना भाजपने म्हटले आहे की, त्यांना गेल्या 18 वर्षात महिलांच्या मदतीसाठी असे काही करावे असे अजिबात वाटले नाही, पण आता निवडणुका जवळ आल्याने ते अशी आश्वासने देत सुटले आहेत.