शिरूर -रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे करोना रुग्ण आढळले आहेत. मात्र, हे रुग्ण दिशाभूल करीत असल्याने ते नक्की रांजणगावचे की आणखी कुठले याबाबत वैद्यकीय अधिकारी व प्रशासनात सोमवार (दि. 15) पासून घोळ सुरू होत आहे. तर यातील दोघे जण पॉझिटिव्ह तर एकजण निगेटिव्ह असल्याची माहिती खरी आहे, असे शिरूर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व रांजणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेराव यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती येथे लांडेवस्तीत करोना रुग्ण आढळला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली तशी माहिती त्यांनी प्रांत अधिकारी यांनाही कळवली; परंतु सोमावारपासून रुग्णाचा शोध लागत नव्हता. एका रुग्णाची मावशी ही गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये भरती केले होते.
तर मुंबईहून मावशीला भेटायला तो रुग्ण स्वतः व सोबत आईला घेऊन आला; परंतु आईची प्रकृती बिघडल्याने आईची तपासणी केली असता आई करोनाबाधित आढळली. संपर्कात असलेल्या मुलाचीही तपासणी केली तर मुलगाही करोनाबाधित आढळला आहे.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी रांजणगाव गणपती असा पत्ता दिला. त्यामुळे शिरूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन रुग्णांच्या संपर्कात कुणी आले आहे का याचा शोध घेत होते. मात्र,गेल्या दोन दिवसांपासून त्याने सांगिलेल्या पत्यासह इतर ठिकाहीही शोध घेतला असता त्याचे घर सापडले नसल्याने अधिकारी हतबल झाले आहेत. तर अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा त्या मुलाशी संपर्क साधला त्यावेळेस त्याने खोटा पत्ता सांगितला असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे नक्की खरे काय हे कोणालाच कळेना.
आता कारवाई करणार का?
करोना पॉझिटिव्ह रुग्ण वेगवेगळी माहिती देत असल्याने प्रशासन त्रस्त झाले आहे तर खोटी माहिती देणाऱ्या व प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या रुग्णावर कारवाई होणार का? याबाबत प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित तरुणाचा मोबाइल नंबर व त्याच्या महिनाभराची सर्व माहिती मिळवण्यासाठी सायबर क्राइमकडे अर्जही दिला आहे. यातून तो रांजणगावमध्ये आला होता की नाही हेही कळेल.- राजेंद्र शिंदे,
वैद्यकीय अधिकारी, शिरूर तालुका