सॅनिटायझर, मास्क विक्रीसाठी ऑनलाइन रक्कम घेण्याचा फंडा
बनावट वेबसाइटद्वारे आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा घातक कट
इंटरपोलने सीबीआय आणि राज्य पोलिसांनाही केले सतर्क
– संजय कडू
पुणे – करोना संसर्ग प्रतिबंधात्मक वस्तूंची मागणी लक्षात घेता त्यांची विक्री करणाऱ्या बनावट वेबसाइटचे जाळे पसरवले आहे. यातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांनी एक घातक कट रचल्याचे समोर आले आहेत. यातून सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे. काही प्रकरणांत बॅंक खात्याची माहिती घेऊन रोकड लंपास केली जात आहे. तर, यातून रोकड लंपास केली जात असून ड्रग्सची तस्करी वाढण्याची भीती आहे.
यासंदर्भात इंटरपोलने सीबीआयला लॉकडाऊनच्या काळात अनेकदा सजग केले आहे. तर, सीबीआयने राज्यसरकारला वेळोवेळी सूचना केल्या आहेत. करोनाचा सामना करण्यासाठी अनेक देश औषध आणि प्रतिबंधात्मक लसीसाठी संशोधन करत आहेत. तर, मात्र करोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना आहेत. यामुळे जागतिक पातळीवर मास्क, हॅन्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायझरला प्रचंड मागणी आहे. याचाच फायदा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या टोळ्या उचलत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. यामुळे ते ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. ही बाब हेरून टोळ्यांनी करोना प्रतिबंधक वस्तूंची विक्री करणाऱ्या फेक वेबसाइटचे जाळे पसरवले आहे. या वेबसाइटवर क्रेडिट/डेबिट कार्डच्या माध्यमातून आगाऊ रक्कम स्वीकारली जाते. यानंतर संबंधित वस्तूंची कधीच डिलिव्हरी केली जात नाही. तर काही वेबसाइट नागरिकांचा क्रेडिट/डेबिट कार्डचा डाटा चोरुन त्यांची बॅंक खाती साफ करत आहेत.
मिथेनॉल शरीरासाठी अत्यंत घातक
बनावट सॅनिटायझर तयार करण्यासाठी मिथेनॉल या रसायनाचा वापर केला जात असल्याचे इंटरपोलने सीबीआयला सांगितले आहे. हे रसायन मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. याप्रकारच्या बनावट सॅनिटायझरची जगभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री होत आहे. मध्यंतरी बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा झाल्यावर अशा बोगस कंपन्यांची उत्पादने मोठ्या प्रमाणात विक्रीस दाखल झाली होती. गरज असल्याने नागरिकही ब्रॅंड, दर्जा, मानांकन, उत्पादनाची तारीख न पाहता ही उत्पादन खरेदी करत होते.
मास्कचा बाजार रोखण्याची गरज
सध्या बाजारात वेगवेगळे फेसमास्क उपलब्ध आहेत. त्यातही “एन-95’च्या नावाखाली बनावट फेसमास्कची विक्रीही होत आहे. यामुळे फेसमास्क वापराच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. अशी बनावट साधने बाजारात आल्याने करोना विषाणूचा धोका आणखी वाढण्याची भीती आहे.