पिंपरी – मोबाइलवर गप्पा मारत बसलेल्या डॉक्टरांच्या वर्तनामुळे दवाखान्याबाहेर ताटकळत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक भडकले. यामुळे महापालिकेच्या दापोडी रुग्णालयात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ही बाब समजताच नगरसेवक राजू बनसोडे यांनी दवाखान्यात येऊन रुग्ण व डॉक्टरांशी संवाद साधत गोंधळ मिटविण्याचा प्रयत्न केला.
दिवसेंदिवस शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. साधा सर्दी, खोकला आणि ताप असला, तरीदेखील रुग्णाकडे संशयाने पाहिले जाते. या कालावधीत अन्य आजारांच्या रुग्णांकरिता महापालिकेच्या दवाखान्यात तपासणीकरिता येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
महापालिकेच्या दापोडी येथील दवाखान्यात सोमवारी सकाळपासून रुग्णांची रिघ लागली होती. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या दवाखान्याबाहेरच रुग्णांना रांगेत उभे रहावे लागत आहे. सकाळी पाऊस सुरु असतानादेखील या दवाखान्यातील डॉक्टरची बराचवेळ मोबाइलवर चर्चा सुरु असल्याने रुग्णांचा संताप अनावर झाला. ही बाब समजताच नगरसेवक राजू बनसोडे यांनी दवाखान्यात येऊन रुग्ण व नातेवाइकांना शांत केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेत कुचराई न करण्याच्या सूचना केल्या.