विद्यमान कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावरून सभासदांमध्ये वादावादी
पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीला पुढील पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा मुद्दा वार्षिक सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. यावेळी सभासदांमध्ये वादावादी झाली असून काही काळ गोंधळाचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, यानंतर याबाबत समिती गठीत करण्यात येणार असून, या समितीच्या अहवालानंतरच पुढील दोन वर्षांत कार्यकारिणीच्या निवडणुकांचे भवितव्य निश्चित होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवारी एस.एम.जोशी सभागृहात रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार यासह पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला पवार यांनी आर्थिक जमा-खर्चासह आगामी अर्थसंकल्पाचा आढावा घेतला. या सभेत विद्यमान कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याच्या मुद्द्याबाबत झालेल्या चर्चेवेळी मते व्यक्त करताना सभासदच एकमेकांना भिडल्याची घटना घडली. विद्यमान कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याबाबत सभेत आवाजी मतदान घेण्यात आले. सदस्यांनी बहुमताने कार्यकारिणीला मुदतवाढ देण्यास पाठींबा दिला.
समिती गठीत केली पण…
अध्यक्ष कसबे यांच्या मुदतवाढीबाबत निर्णय देताना एका समितीची निवड केली. मात्र, या समितीतील सर्व सभासद हे मसापचे कार्यकारिणी सदस्य आणि शाखांचे पदाधिकारी असल्याने सभासदांनी या समिती निवडीवर आक्षेप घेतला. यामुळे गोंधळ निर्माण झाला. आक्षेपानंतर कसबे यांनी दोन कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकारी नसणाऱ्या तीन आजीव सभासदांची समिती गठीत करणार असल्याचे जाहीर केले.
…तर मी अध्यक्ष नसेन : कसबे
कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव बहुमताने मान्य केला असून, तो फेटाळण्याचा मला अधिकार नाही. मुदतवाढ ही बेकायदेशीर नाही. परंतु, हे नैतिक आहे का, हा माझ्या मनात प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करावी. या समितीने दर 6 महिन्यांनंतर विद्यमान कार्यकारिणीला अहवाल द्यावा. 2 वर्षांपर्यंत जर परिस्थिती पूर्वपदावर आली आणि समितीने निवडणुका घेण्याचा अहवाल दिल्यास कार्यकारिणीने निवडणूक घ्यावी. ही माझी नैतिक भूमिका आहे. याप्रमाणे निवडणुका न घेतल्यास, मी अध्यक्ष राहणार नाही, असे रावसाहेब कसबे यांनी स्पष्ट केले.
सभासद हमरीतुमरीवर…
या सभेत उपस्थित सभासदांनी मुदतवाढीच्या समर्थनार्थ आणि विरोधात मते मांडली. यावेळी सभागृहात उपस्थित असणाऱ्या सभासदांनी एकमेकांच्या मतांबाबत आक्षेप घेतला. यावेळी हे वाद हमरीतुमरीवर देखील आले. दरम्यान, यावेळी काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला. तर सभेच्या उत्तरार्धात देखील मतमतांतरे होऊन गदारोळ निर्माण झाला.