पिंपरी – सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी महावितरणने 97 लाख 50 हजार 479 रुपयांची विविध कामे काढली आहेत. महावितरणच्या रास्ता पेठेतील अधीक्षक अभियंता कार्यालयात आज शुक्रवारी (दि. 29) दुपारी एक वाजता लॉटरी सोडत पद्धतीने या कामांचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये पिंपरी विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या सांगवी उपकेंद्रातील सुमारे दहा लाखांच्या कामाचा समावेश आहे.
विद्युत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक बेरोजगार अभियंत्यांना महावितरणने लॉटरी पद्धतीने मोठ्या प्रमाणात कामे देण्याचे धोरण अवलंबिले आहे. बेरोजगारीचे वाढते संकट लक्षात घेता, विद्युत शाखेतील प्रत्येक पदविकाधारक आणि पदवीधारक तरुणांना कंत्राट घेणे शक्य होत नाही.
कामांच्या निविदेत होणाऱ्या जीवघेण्या स्पर्धेत हे अभियंते पात्र ठरू शकत नाही. पात्र ठरले तरी तग धरु शकत नाहीत. त्यामुळे स्पर्धात्मक विद्युत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक तरुण, तरुणींना महावितरणकडून 10 लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा देण्याची तरतूद केली आहे. ही कामे एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास लॉटरी पद्धतीने वाटली जातात.
पहिल्या वर्षात मिळालेली कामे सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्याने मुदतीत व यशस्वीपणे पूर्ण केली तर त्यांना दुसऱ्यावर्षी त्यापेक्षा अधिक रकमेचे काम दिले जातील. विद्युत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक बेरोजगार अभियंत्यांसाठी महावितरणने आपल्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक सुरू केली असून, त्याठिकाणी उमेदवार माहिती भरून लॉटरी पद्धतीने कामे मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.
महावितरणच्या पुणे आणि कोल्हापूर परिमंडळांतर्गत 97 लाख 50 हजार 479 रुपयांची एकूण 10 कामे काढली आहेत. त्यामध्ये पुणे व कोल्हापूर परिमंडळातील दहा लाख रुपयांच्या आतील प्रत्येकी पाच कामांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या सांगवी उपकेंद्रातील 9 लाख 59 हजार 329 रुपयांच्या कामाचा समावेश आहे.
लॉटरी पद्धतीत पारदर्शकता हवी
गेल्या महिन्यात अशा प्रकारे सोडत पद्धतीने अधीक्षक अभियंता कार्यालयात लॉटरी पद्धतीने सोडत पार पडली होती. मात्र, यामध्ये एकाच अभियंत्याला कामे देण्यावर उपस्थित अभियंत्यांनी आक्षेप घेतला होता. अशाप्रकारामुळे पात्र ठरूनही कामे मिळत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. कामे द्यायची असेल, तर लॉटरी पद्धतीत पारदर्शकता हवी, अशी या अभियंत्यांची आग्रही मागणी आहे.
प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला कामाचा अनुभव नसल्याने त्याला महावितरणचे काम घेण्यासाठी निविदा प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे सादर केल्यानंतर सुशिक्षित बेरोजगारांच्या होणाऱ्या नोंदणीमुळे त्यांना दहा लाखांपर्यंतची कामे घेता येत असल्याने दिलासा मिळाला आहे. या कामांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
– गिरीश बक्षी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड इलक्ट्रिकल कॉनट्रॅक्टर्स असोसिएशन