कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या रॅलीदरम्यान पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांदरम्यान जोरदार संघर्ष झाला. भाजपने राज्याच्या सचिवालयावर काढलेल्या रॅलीला रोखण्यासाठी पोलिसांनी वाटेत अडथळे उभारले होते. हे अडथळे पार करून रॅली पुढे नेण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर या संघर्षाला प्रारंभ झाला, असे पोलिसांनी सांगितले.
पश्चिम बंगालमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या निषेधार्थ नबन्ना येथील सचिवालयाच्या दिशेने ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीसाठी कोलकाता आणि हावडा येथील भाजपचे हजारो कार्यकर्ते जमा झाले होते.
ही रॅली रोखण्यासाठी पोलिसांनी वाटेत अडथळे उभे केले होते. हे अडथळे ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केल्यावर पोलिसांनी लाठीमार आणि पाण्याचे फवारे मारून कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू बॅनर्जी आणि खासदार ज्योतिर्मयसिंह महातो हे जखमी झाले. कोलकात्यातील हस्तिंग भागातही पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. हावडा जिल्ह्यातून आणि कोलकाता शहरातून निघालेल्या चार मोठ्या रॅली काढण्यात येणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
साथ रोग कायद्याखाली मोठ्या कार्यक्रमांना तृणमूल कॉंग्रेसने परवानगी नाकारली आहे. केवळ 100 कार्यकर्त्यांच्या राजकीय कार्यक्रमांनाच परवानगी दिली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. नबन्ना सचिवालय निर्जंतुकीकरणासाठी 8 तारखेपासून दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.