नवी दिल्ली : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याने काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मदत केल्याची कबुली दिली होती. त्याच्या याच कबुली जबाबानुसार आज निकाल देण्यात आला आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे.
एनआयए न्यायालयाने यासिन मलिक प्रकरणी आज निकाल सुनावला. यासिनच्या शिक्षेवर 25 मे रोजी न्यायालय निकाल सुनावणार आहे. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. यासिन मलिकविरोधात देशविरोधी कारवायाचा आरोप होता. मलिक विरोधात ‘युएपीए’ कायद्यातील कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल होते.
मागील सुनावणीत यासिन मलिकने दिल्लीतील एनआयए न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर कोर्टाने 19 मे पर्यंत सुनावणी टाळली होती. मलिकने न्यायालयाला सांगितले की, त्याच्या विरोधात लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे म्हटले. यासिन मलिकने जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरातून बेकायदेशीर आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला असल्याचे न्यायालयाने याआधी म्हटले होते.
न्यायालयाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता फारुख अहमद उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, नयीम खान, मोहम्मद अकबर खंडय, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, झहूर अहमद शाह वातली, शबीर अहमद शाह, नवल किशोर कपूर आदींविरोधात आरोप निश्चित केले आहेत.