तळबीडची खाकी निवांत…! म्हणे, “मस्त चाललंय आमचं’

पराग शेणोलकर

कराड  – कराडच्या सुजलाम-सुफलाम हद्दीत तळबीड पोलीस ठाण्याचा कारभार काही अलबेल चालला आहे. 12 गावच्या कार्यक्षेत्रात लॉकडाऊनमध्ये अवैध धंद्याना ऊत आला आहे. महामार्गासह परिसरातील चोऱ्या, खून यांचे तपास कागदावरच राहिले असताना “मस्त चाललंय आमचं’ अशा तोऱ्यात येथील खाकी वावरत आहे. तळबीड पोलीस ठाण्यावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याने मोकाट झालेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवर घालण्याची मागणी होत आहे.

कराड तालुक्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे, ता. कराड येथील औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेनंतर तळबीड पोलीस ठाण्याची स्वतंत्र पद्धतीने स्थापना करण्यात आली. यापूर्वी कराड व उंब्रज पोलीस ठाण्याच्या आधीन असलेल्या 12 गावांचा कारभार तळबीड पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आला. तसेच औद्योगिक वसाहत व 2003 साली उभारलेला तासवडे टोलनाका आणि काही किलोमीटरचा महामार्ग, यशवंतनगर येथील साखर कारखाना परिसर असा संवेदनशील भाग याच पोलीस ठाण्याअंतर्गत येतो. परंतु, अलिकडच्या काळात छोटे पोलीस ठाणे म्हणून याकडे वरीष्ठांनी पाठ फिरवल्याने अनेक गैरप्रकारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे.

खाकीतले साहेब…”मस्त चाललंय आमचं’ अशा आविर्भावात वावरत आहेत. महामार्गावर अपघात झाल्यास हाकेच्या अंतरावर असणारे येथील पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहचतील याची शाश्वती नाही. महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी अपघातस्थळी पोहोचल्यानंतर वरातीमागून घोडे अशी काही अवस्था तळबीड पोलिसांची झाल्याचे पहावयास मिळत आहेत. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर तासवडे टोलनाक्यावर सततची वादावादी यासह अनेक गैरप्रकाराकडे पोलिसांकडून सपशेल दुर्लक्ष केले जाते. तर तपासणीच्या नावाखाली टोलनाक्याच्या दोन्ही बाजुला वाहने उभी करून एक प्रकारचा “पोलीस टोल’च वसूल केला जात आहे.

मुळात पोलीस ठाण्याची वास्तू ही तासवडे औद्योगिक वसाहतीत आहे. अलिकडे विस्तार झालेल्या या औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या आहेत. आणि परप्रांतीय कामगारांचा राबताही मोठा आहे. त्यामुळे एखादा गैरप्रकार घडल्यास तपासाचे मोठे आव्हान निर्माण होवू शकते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत वहागाव, तळबीड, शिरवडे, कारखाना यासह परिसरात करोना महामारीच्या लॉकडाऊन काळात चढ्या दराने अवैध दारू व गुटखा विक्री, चोरटा वाळू उपसा याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून “मस्त चाललंय आमचं’ अशा आविर्भावात येथील पोलीस वावरत असल्याने नागरिकांच्याकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास अजूनही रेंगाळत पडला आहे. नऊ महिन्याचा कालावधी उलटला तरीही वराडे गावच्या हद्दीतील कृष्णा नदीपात्रात खून करून पोत्यात कोंबून टाकलेल्या मृत अज्ञात व्यक्तीची ओळख पोलिसांना अद्याप पटवण्यात यश आलेले नाही. ढिम्म अशा पोलीस तपासावर संशयित मारेकरी पोलिसांच्या नाकावर मोकाट फिरत नसतील ना! अशी चर्चा आहे. यासह महामार्गासह वाहन धारकांना लुटल्याच्या घटना परिसरातील चोरीच्या घटना यांचा उलघडा होणार का? अशा अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या तळबीड पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांनी न्याय हक्काची काय अपेक्षा करावी, असे म्हटलेतर वावगे ठरणार नाही. येथील कारभार सुधारण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

– अवैध दारू, गुटख्याची राजरोस विक्री

तळबीड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील महामार्गालगतची हॉटेल, ढाब्यावर लॉकडाऊनपासून अवैध मार्गाने दारू, गुटख्याची चढ्या दराने विक्री करून मालामाल होणाऱ्यांवर पोलिसांची भलतीच मेहरबानी आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांना याचे काही देणे घेणे नाही. अवैध धंदे कोणाच्या कृपा आशीर्वादाने सुरु आहेत. आणि त्यातून मिळणाऱ्या “वर’ कमाईने कोणाचे खिसे गरम होत आहेत, हा खरा संशोधनाचा विषय आहे.

– अवैध गॅस विक्रीला नव्या जोमाने सुरुवात

उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी सात महिन्यापूर्वी तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वराडे येथे सुरू असलेल्या अवैध घरगुती गॅस टाकीच्या गोदामावर छापा टाकून 57 हजार 828 रुपयांचा मुद्दे माल ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता. काही दिवसातच या अवैध गॅस विक्रीला नव्या जोमाने सुरवात झाली. पोलीस ठाणे इमारतीच्या चौकटीतून दिसणाऱ्या अवैध गॅस टाकीच्या दुकानावर तळबीड पोलिसांची नजर कशी काय पडली नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस उपअधीक्षकांनी यापूर्वी केलेल्या कारवाईचे गांभीर्य तळबीड पोलिसांना नसल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.