डॉक्‍टरांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

रुग्णांचे हाल : शहरातील डॉक्‍टरांकडून निदर्शने

पिंपरी  – पश्‍चिम बंगालमध्ये डॉक्‍टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ पुकारणाऱ्या आलेल्या देशव्यापी संपामध्ये शहरातील काही डॉक्‍टरांनी सहभाग घेत संप पाळला. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशव्यापी संपाचे आवाहन केले होते. पश्‍चिम बंगालमध्ये उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन ट्रकमध्ये आलेल्या नातेवाईकांनी डॉक्‍टरांवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेचा देशभरातील डॉक्‍टरांकडून निषेध व्यक्‍त करण्यात येत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी एक दिवसाचा देशव्यापी संप जाहीर करण्यात आला होता. या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

सकाळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात डॉक्‍टरांनी एकत्र येवून या घटनेचा निषेध व्यक्‍त केला. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड अध्यक्ष डॉ. सुहास माटे, पेटरन डॉ. दिलीप कामत, सचिव डॉ. सुधीर भालेराव, माजी अध्यक्ष डॉ. संजय देवधर, पिंपरी-चिंचवड डॉक्‍टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजीव दाते, इंडियन डेंटल असोसिएशनच्या डॉ. मनीषा गरुड, डॉ. दीपाली पाठक, त्याचबरोबर त्वचारोग तज्ञ, पॅथॉलॉजी विभाग, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, विविध मेडिकल कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुधीर भालेराव म्हणाले की, डॉक्‍टर म्हणजे देव नाही. डॉक्‍टर हा सुद्धा सर्वसामान्य माणूस आहे. तो त्याची पूर्ण कौशल्ये वापरून रुग्णावर उपचार करीत असतो. काही वेळा वैद्यकीय उपचार सुरु असताना रुग्ण दगावतो. त्यात डॉक्‍टरांची चूक नसते. तरीही रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्‍टरांवर हल्ले होतात. डॉक्‍टरांवर वाढत्या हल्ल्यांवर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करणे आवश्‍यक आहे. डॉक्‍टरांनी पुकारलेल्या बंद मुळे शहरातील काही क्‍लिनिक व रुग्णालये बंद होती.

Leave A Reply

Your email address will not be published.