पुणे – “कोथळा बाहेर काढू हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले कथित विधान धमकवणारे आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी,’ अशी मागणी करत “राऊत यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही,’ असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.
शहर भाजपच्या वतीने खासदार राऊत यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात सोमवारी यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, “डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज स्वीकारला असून त्यावर विधी विभागाचा सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करू,’ अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली.
यावेळी सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, संदीप लोणकर, इशानी जोशी, संजय देशमुख यांच्यासह कायदा विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.