पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेने शहरात वेगवेगळ्या भागांत कोविड केअर सेंटर उभारली होती. त्याअंतर्गत गणेश कला क्रीडा मंच येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील सुमारे 28 सेविकांना दोन महिन्यांचे वेतनच दिले गेले नसल्याचे समोर आले आहे. आपत्तीच्या काळात जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या या सेविकांना ऐन सणासुदीत हक्काच्या पैशांसाठी महापालिकेचे उंबरे झिजवण्याची वेळ आली आहे.
या ठिकाणी महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने 120 बेड्सची व्यवस्था केली होती. मात्र, त्यानंतर करोनाची साथ ओसरण्यास सुरूवात झाल्याने रुग्णसंख्या घटत गेली. त्यामुळे याठिकाणी पालिकेने प्रत्यक्षात 60 रुग्णांपर्यंतच उपचाराला परवानगी दिली होती.
ऑगस्टमध्ये हे सेंटर बंद करण्यात आले. मात्र, रुग्णसेवा करणाऱ्या 28 जणींचे जून आणि जुलैचे वेतनच देण्यात आले नाही. यातील बहुतांश सेविका जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडील पैसेही संपत आले असून, या वेतनाच्या आशेवर या सेविका पुण्यात थांबून आहेत. त्यामुळे महापालिकेने आमच्या हक्काचे पैसे द्यावेत, अशी मागणी या सेविकांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.
संबंधित कोविड केअर सेंटर चालवणाऱ्या संस्थेने चुकीचे बिल सादर केले होते. त्यामुळे ते मंजूर होऊ शकले नाही. आता सुधारित बिल स्थायी समितीच्या मंजुरीसाठी दिले आहे. तर संस्था चालकांनी या सेविकांना एका महिन्याचा पगार स्वत: दिला असून बिले आल्यानंतर उर्वरित पगार दिला जाईल.
– डॉ. आशिष भारती, आरोग्य विभागप्रमुख, मनपा