मोदींची लालबहादूर शास्त्रींशी तुलना तर राहुल गांधींचा सामोसे खातानाचा फोटो प्रचंड व्हायरल; चर्चांना उधाण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळेच मोदी जेव्हा एखादी गोष्ट किंवा फोटो पोस्ट करतात तेव्हा त्याची चर्चा जगभरामध्ये होते. सध्या असेच चित्र पहायला मिळत आहे मोदींनी अमेरिकेसाठी उड्डाण केल्यानंतर एअर इंडिया वनमधून पोस्ट केलेल्या एका फोटोची. विशेष म्हणजे मोदींनी हा फोटो पोस्ट केल्यानंतर आता या फोटोवरुन त्यांची आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा असणाऱ्या गांधी कुटुंबियांच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास पंतप्रधान मोदी अमेरिकेसाठी दिल्लीमधून रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी मोदी अमेरिकेला रवाना झाले. मोदींनी विमानात बसल्यानंतर काम करतानाचा एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास मोदींनी शेअर केलेल्या या फोटोला सध्या १२ तासांच्या आतमध्ये १८ हजारांहून अधिक रिट्विट मिळाले आहेत. “फार दिर्घकाळ विमानप्रवास म्हणजे कागदोपत्री काम आणि काही महत्वाच्या फाइल्स तपासण्याची संधी असते,” अशा कॅप्शनसहीत मोदींनी हा फोटो शेअर केला.

मोदींच्या या फोटोवर सात हजार ८०० हून अधिक कमेंट आल्या तरी या फोटोच्या पार्श्वभूमीवर भाजपा समर्थकांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका केल्याचे दिसत आहे.  भाजपा आयटी सेलचे सदस्य आणि टीव्हीवरील चर्चा सत्रांमध्ये भाजपाची बाजू मांडणाऱ्या धवल पटेल यांनी ट्विटवरुन मोदींनी पोस्ट केलेला फोटो आणि गांधी कुटुंबियांचे काही फोटो ट्विट करत दोघांच्या कार्यपद्धतीची तुलना केली आहे.

“नेहरुंचे वंशज विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी… दोघांमधील फरक स्पष्ट दिसतोय,” अशी कॅप्शन पटेल यांनी दिली आहे. यामध्ये पटेल यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी अमेरिकेला जाताना विमानात काम करताना दिसत असल्याचा फोटो आहे. शिवाय त्याचसोबतच राहुल गांधी हेलिकॉप्टरमध्ये सामोसे खातानाचा, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी विमान प्रवास करतानाचा आणि एअर इंडियाच्या विमानामधून गांधी कुटुंबीय उतरतानाचे फोटोही आहेत.

पटेलच नाही तर इतरही काही जणांनी मोदींचा कालचा आणि गांधी कुटुंबियांचे आधीचे फोटो शेअर करत काँग्रेसमधील सर्वोच्च घराण्यावर निशाणा साधलाय. अनेकांनी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आठवण झाली असून मोदींची तुलना त्यांच्याशी केली जात आहे.

भाजपा समर्थकांकडून मोदींच कौतुक होत असलं तरी मोदींच्या या फोटोवर टीकाकारांनी त्यांना लक्ष्य केल्याचंही पहायला मिळत आहे. अनेकांनी हा फोटो दिखाऊपणा असल्याचे  म्हटले आहे. तर मोदी समर्थक आणि भाजपा समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी सदैव तत्पर असतात आणि काम करण्यासाठी मिळालेला कुठलाही वेळ ते वाया न घालवता सत्कारणी लावतात असे म्हणत मोदींचे कौतुक केल्याचे चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.