अकोला – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पुरोगामी विचारांचे सरकार आहे. कल्याणकारी राज्य म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. या राज्यातील दिव्यांग बांधवांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे असून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी हे शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
तसेच अकोला जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दिव्यांग सर्व्हेक्षणाचा उपक्रमही राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याबाबतही शासन लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
अकोला जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 119 दिव्यांग बंधू भगिनींना इलेक्ट्रिक फिरते तीन चाकी विक्री क्रेंद्र वितरण करण्यात आले.
या सोहळ्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते.