पोम पेह (कंबोडिया) – सर्वसाधारणपणे अतिसंवेदनशील घ्राणेंद्रियांच्या आधारे भूसुरुंग, अमली पदार्थ आणि स्फोटकांचा माग काढण्याच्या कामगिरीवर श्वानपथकाची नियुक्ती केली जात असते. मात्र कंबोडियामध्ये या कामासाठी चक्क एका उंदराला कामाला लावले गेले होते.
कंबोडियात भूसुरुंग शोधून काढणाऱ्या मागवा या उंदराचे नुकतेच निधन झाले. तो 8 वर्षांचा होता आणि त्याने आपल्या 5 वर्षांच्या करिअरमध्ये 100 पेक्षा अधिक भूसुरुंग शोधून काढले होते. त्याच्या या कामगिरीबद्दलच त्याला “हिरो’ म्हणून संबोधले जात असायचे.
गेल्या आठवड्याच्या अखेरीस मागवाचे निधन झाले. “अपोपो’ या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेने त्याची नियुक्ती केली होती. या संस्थेने प्रशिक्षित केलेल्या उंदरांच्या मदतीने भूसुरुंग आणि क्षयरोगाच्या संसर्गाची ठिकाणे शोधून काढली जात असतात. या प्रशिक्षित उंदरांमध्येच मागवा हा उंदिरदेखील होता.
अखेरच्या आठवड्यापर्यंत तो आपल्या सवंगड्यांसमवेत खेळत आणि मस्ती करत होता. मात्र गेल्या आठवड्यापासून त्याने आहार कमी घ्यायला सुरुवात केली होती, असे या संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कंबोडियामध्ये दशकभरापासून यादवी युद्ध सुरू आहे. देशाचा बराचसा भूभाग अजूनही बंडखोरांच्या ताब्यात आहे. या भागात अनेक भूसुरुंग पेरलेले असतात. ते शोधून नष्ट करण्यासाठी अशा उंदरांचा वापर केला जात असतो.
मागवाचा जन्म टांझानियात झाला होता. तेथून त्याला 2016 मध्ये कंबोडियात आणले गेले होते. मागवाने 100 पेक्षा भूसुरुंग शोधून काढले होते. त्याबद्दल त्याला 2020 मध्ये सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते. गेल्यावर्षी जून महिन्यात मागवा सेवेतून निवृत्त झाला होता.