उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कराचा उल्लेख मोदीजी की सेना म्हणून केला. त्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे.
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये रविवारी भाजपची प्रचारसभा झाली. त्या सभेत बोलताना योगींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. दहशतवादाला चालना देण्यासाठी कॉंग्रेसचे लोक खतरनाक दहशतवादी मसुद अजहरला जी म्हणतात. सत्तेत असताना कॉंग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत होते. त्याउलट, मोदींची सेना दहशतवाद्यांना गोळ्या घालते आणि त्यांच्यावर बॉम्ब डागते, असे योगींनी म्हटले. त्यावरून विरोधकांनी योगींवर टीकेची झोड उठवली. त्यांचे वक्तव्य भारतीय सुरक्षा दलांचा अवमान असल्याच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून देण्यात आल्या. निवडणूक आयोगानेही योगींच्या वक्तव्याची दखल घेतली. त्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे का याची छाननी आयोग करणार आहे. त्यासाठी गाझियाबादच्या जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवण्यात आला आहे. सुरक्षा दलांच्या मोहिमांचा वापर प्रचारासाठी केला जाऊ नये, अशी सूचना निवडणूक आयोगाने याआधीच राजकीय पक्षांना केली आहे.