पुणे – आपल्या सर्वांच्या वाड- वडीलांनी मेहनतीने कमवलेल्या, टिकवलेल्या जमिनीवर देशाच्या इतिहासात गौरवाने ओळखली जाईल अशा प्रकारे सामूहिक विकासाची संकल्पना आपणा सर्वांचा विश्वास व ग्राहक बळावर यशस्वी झाली आहे. १९९९ साली १३० पेक्षा अधिक शेतकर्यांनी एकत्र येऊन फार्मर्स डायरेक्ट इनव्हेस्टमेंट (एफडीआय) सामूहिक विकासाची ही एक नवी संकल्पना जगासमोर मांडली. ही यशस्वी संकल्पना आजही प्रगती पथावर आहे. हा प्रवास असाच पुढे सुरू राहो अशी प्रेरणादायी आशा मगरपट्टासिटी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी व्यक्त केली.
शेतकर्यांनी एकत्र येऊन टाऊनशीप उभारणीच्या व बांधकाम क्षेत्रातील वेगळ्या विकासाच्या सहकाराचे उदाहरण जगासमोर मांडणाऱ्या मगरपट्टा सिटी या अनोख्या संकल्पनेला २५ वर्षे होत आहेत. या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त मगरपट्टासिटीमधील नागरिकांनी रविवार, ३ डिसेंबर २३ रोजी नागरिकांकडून मशाल रॅली, दीपोत्सव व भव्य आतषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. या मशाल रॅलीमधून प्रज्वलित झालेली ज्योत मगरपट्टा सिटी ग्रुपच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात वर्षभर तेवत राहणार आहे. या मशाल रॅली समारोप प्रसंगी श्री. सतीश मगर बोलत होते.
या रॅलीत मगरपट्टासिटीतील वीस हजारांहून अधिक नागरिक, मगरपट्टासिटीमधील सहभागी भागधारक, त्यांचे कुटुंबिय, मगरपट्टासिटीचे संचालक मंडळ. सर्व विभागांचे कर्मचारी, प्रशासन, स्वच्छता व सुरक्षा कर्मचारी आदी जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निमित्ताने रॅलीनंतर लाईड आणि साउंड शो सह डोळे दिपवणारी आतषबाजी देखील आयोजित करण्यात आली. या निमित्ताने मगरपट्टासिटी वासियांनी आपापल्या सोसायटी समोर रांगोळी आणि दिव्यांची आकर्षक सजावट केली होती.
कोणत्याही शहराचा विकास हा लोकांच्या सहभागातून, समन्वयातूनच होतो, याचे सर्वोत्तम यशस्वी उदाहरण म्हणजे मगरपट्टा सिटी शहर. हा लोक सहभाग व समन्वय लोकांनी आयोजित उत्सवातून प्रकट होतो तो सामूहिक उत्सव बनतो. जसा आज आपण साजरा करतो आहोत. मगरपट्टा सिटीच्या या अनोख्या संकल्पनेचा हा रौप्यमहोत्सव तुम्हा सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा उत्सव आपण येत्या वर्षभरात साजरा करणार आहोत. असेही श्री मगर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सायंकाळी ५ वाजता मुख्य गेट पासून सुरू झाली. रॅलीमध्ये मगरपट्टासिटीमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. २४ वर्षांचा प्रवास लक्षात घेऊन २४ मशाली बनविण्यात आल्या होत्या. ज्या मगरपट्टासिटीतील विविध सोसायटीतील नागरिकांनी, मगरपट्टासिटीमधील सहभागी भागधारक, त्यांचे कुटुंबिय, मगरपट्टासिटीतील सर्व विभागांचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचार्यांनी या मशाल हाती घेऊन पूर्ण शहरात ही रॅली काढली. या वेळी महिला व तरूणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. महिलांनी उत्साहाने पारंपरिक वेषभूषा केली होती. तर लहानग्या मुलांनी आपल्या शहराविषयीची मनोगत मांडणारी फलक हाती घेऊन रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीचा त्याचा समारोप मुख्य कार्यालयासमोरील परिसरात झाला.
– वर्षभर प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रम आयोजन होणार
– मगरपट्टासिटी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँडवर सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत सादर करीत रॅलीचे स्वागत केले
– मगरपट्टा सिटी सिक्युरिटी कर्मचार्यांच्या ढोल ताशा पथकाच्या वादनावर नागरिक ठेका धरताना व नाचताना दिसले
– संपूर्ण मगरपट्टा शहरभर ६ किमी रॅली झाली
– दीपोत्सव व आतषबाजीमुळे मगरपट्टासिटीमधील नागरिकांनी दिवाळी पुन्हा एकदा साजरी केली
– कार्यक्रमाच्या अखेरीस डोळे दीपवणारी आतषबाजी सादर