पुणे- कोरोना विषाणूंचा संसर्ग (COVID-19) रोखण्यासाठी मगरपट्टासिटी व नांदेडसिटी व्यवस्थापनाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या मदतीने व शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे दोन्ही शहरांमधील नागरिक तसेच या शहरातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत.
विशेष म्हणजे आरोग्याशी संबंधित कोणत्याही अडचणी येऊ नये, म्हणून राज्य शासनाच्या आरोग्य विभागासह नांदेडसिटीमधील सर्व कुटुंब व कुटुंबीयांचे आरोग्य सर्वेक्षण याआधीच पूर्ण केले असून मगरपट्टासिटीमधील सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू आहे.
राज्यभरासह पुणे महानगरात कोरोना विषाणु संसर्गाची बाधा झालेले काही रूग्ण आढळल्यानंतर पुणे महानगरासह संपूर्ण राज्यभरातील जनमानसात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या राज्य, जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून एकत्रितरित्या आवश्यक उपाययोजना सर्वत्र अंमलात आणल्या जात आहेत.
मगरपट्टासिटी व नांदेडसिटीतील १७ हजारांहून अधिक कुटुंब, तसेच इथे असणाऱ्या कंपन्यांमधील १ लाख ४० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे कोरोना विषाणुच्या संसर्गापासून बचाव व सुरक्षिततेच्या दृष्टीने मगरपट्टासिटी व नांदेडसिटी व्यवस्थापन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. स्थानिक प्रशासनाने शिफारस केल्याप्रमाणे सर्व निवासी व व्यावसायिक इमारतींमधील लॉबी, लिफ्ट, लिफ्ट पॅनेल्स, एस्केलेटर, पायऱ्यांचे फवारणी व निर्जंतुकीकरण केले जात आहे. आरोग्य विभागाने शिफारशीप्रमाणे `अँटीव्हायरल लिक्विड`द्वारे इमारतींचे मजले मोपिंग केले जात आहेत.
दोन्ही टाऊनशीपमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी व निर्जंतुकीकरण केले जात आहे. कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व अभ्यागतांची संबंधीत साधनांव्दारे तपासणीची प्रक्रिया देखील काटेकोरपणे राबविली जात आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही शहरांमधील नागरिकांना मेल्स व व्हॉट्स अॅप संदेशाद्वारे सतत जागरूकता निर्माण करणारे संदेश व त्यांचे समन्वय केले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती करण्यात येते आहे, अशी माहिती मगरपट्टासिटी व नांदेडसिटी व्यवस्थापनाने दिली आहे.