जुन्नर (प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्यातील आंब्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या येणेरे गावाचे आज सर्वत्र कौतुक होत आहे. विविध पदावर आणि विविध ठिकाणी पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या चौघांचा सलग चार वर्षे गौरव होत असल्यामुळे गावकरी आनंदात आहेत.
पोलीस नाईक हेमंत घोगरे यांना या वर्षीचे महाराष्ट्र पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाले आहे. त्यांना महाराष्ट्र दिनी गौरविण्यात येणार होते मात्र यंदा करोना लॉकडाऊनमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही.
पोलीस हवालदार अनिल घोगरे (२०१७), राजेंद्र चासकर (२०१८) व पोलीस निरीक्षक अनिल ढोले (२०१९) यांना हाच सन्मान यापूर्वी मिळाला आहे. या गावातील ३० पेक्षा अधिक पोलीस मुंबई व परिसरात कार्यरत आहेत. राज्यातील जे पोलीस अधिकारी व कर्मचारी उत्कृष्टसेवा, गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई, नक्षलवाद विरोधी कारवाई, दरोडेखोरांविरोधात कारवाई, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आदीप्रसंगी विशेष कामगिरी बजावतात त्यांना पोलीस महासंचालक पदक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येत असतो.