नव्याने 369 बाधित सापडले : 818 डिस्चार्ज
पुणे – पंधरा दिवसांपूर्वी तब्बल हजारापर्यंत पोहोचलेली अत्यवस्थ करोना बाधितांची संख्या तब्बल तीनशेने कमी झाली आहे. तर सक्रिय बाधितांची संख्याही निम्म्याने खाली आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळत आहे. दरम्यान, गुरुवारी नव्याने 369 बाधित सापडले, तर 818 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासांत करोनामुळे 31 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत 4 हजार 66 जण करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
शहरात सध्या करोना बाधितांची संख्या कमी होत असून, मागील आठ दिवसांपासून तीनशे ते चारशे बाधित सापडत आहे. नमुने तपासणी संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. सात ते आठ हजारांपर्यंत पोहोचलेली नमुने तपासणी संख्या आज साडेतीन हजारांपर्यंत खाली आली आहे. आज दिवसभरात 3 हजार 518 जणांची नमुने तपासणी करण्यात आली.
शहरात सक्रीय बाधितांची संख्या 7 हजार 778 असून, त्यातील 708 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामध्ये 384 बाधित व्हेंटिलेटर तर 324 बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. 1 हजार 879 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.