दिलासादायक ! आगामी काळात महागाई वाढणार नाही; अर्थमंत्रालयाच्या सल्लागारांचा दावा

नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम झालेला नाही. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा विकास दर 11 टक्‍क्‍यांच्या जवळपास जाईल असा दावा अर्थ मंत्रालयाचे सल्लागार के व्ही सुब्रमण्यन यांनी केला आहे.

या वर्षी अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर संसदेमध्ये आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले होते. या आर्थिक सर्वेक्षणामध्ये या वर्षाचा विकास दर 11 टक्के होईल असे म्हटले होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये करोनाची दुसरी लाट भारतामध्ये आली. त्यामुळे बऱ्याच राज्यात काही प्रमाणात निर्बंध जारी करण्यात आले होते. त्यामुळे विकास दर कमी होईल असे बऱ्याच पतमानांकन संस्थांनी म्हटले आहे.

मात्र एकूण परिस्थितीचा आढावा घेतला असता दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम झालेला नाही. त्यामुळे विकास दर ठरल्याप्रमाणे अकरा टक्के होईल असे त्यांना वाटते. ते म्हणाले की, गेल्या वर्षी लॉक डाऊनवेळी रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारने बऱ्याच सवलती दिल्या होत्या. पायाभूत क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढविण्यात येणार आहे. मॅन्युपॅक्‍चरींग क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुदान योजना जाहीर केली आहे. गेल्या वर्षी तुंबलेली मागणी यावर्षी वाढणार आहे. त्याचबरोबर व्याजदर कमी पातळीवर आहेत. या कारणामुळे विकास दर वाढत जाईल असे वातावरण आहे.

पुढील वर्षी विकास दर सात टक्के होईल आणि त्या पुढील वर्षात तो वाढत जाईल. गेल्या वर्षाचा विकास दर कमी असल्यामुळे या वर्षाचा विकास 11 टक्के होईल असे त्यांना वाटते. पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात महागाई वाढणार नाही असा दावा त्यांनी केला. 1991 मध्ये ज्या प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या होत्या तशाच प्रकारच्या सुधारणा गेल्या दोन वर्षांमध्ये करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विकास दर वाढण्यास पूरक वातावरण निर्माण होणार आहे असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.