Stock Market : शेअर बाजार निर्देशांकांत घट

मुंबई – विविध देशात करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून जागतिक शेअर बाजारात घसरण चालू आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही विक्री होऊन गेल्या तीन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत.

मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 354 अंकांनी कमी होऊन 52,198 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 120 अंकांनी कमी होऊन 15,632 अंकांवर बंद झाला.

विश्‍लेषकांनी सांगितले की, करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे अमेरिका आणि युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. त्यामुळे क्रुडचे दरही कमी झाले. या घटनाक्रमामुळे अमेरिकेच्या रोख्यावरील परतावा कमी होत आहे. यामुळे गुंतवणूकदार बचावात्मक भूमिका घेत आहेत.

त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये महागाई वाढण्याची शक्‍यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून जागतिक पातळीवर नफेखोरी चालू आहे. परिस्थिती पूर्ववत होण्यास बराच काळ लागू शकतो. विक्रीचा जोर इतका होता की मंगळवारी सर्व क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. त्यामध्ये धातू, ऊर्जा, दूरसंचार या क्षेत्राचा समावेश आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप दिड टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत असून काल या गुंतवणूकदारांनी 2,198 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली.

एसीसी कंपनीला पहिल्या तिमाहीत चांगला नफा झाल्यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव आज 7 टक्‍क्‍यांनी वाढून 52 आठवडयांच्या उच्चांकी पातळीवर गेला. मात्र एचसीएल टेक्‌ कंपनीचा नफा कमी झाल्यामुळे आज या कंनीच्या शेअरचा भाव 2 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे दिसून आले. या कंपनीच्या नफ्यात 10 टक्‍क्‍यानी वाढ झाली असली तरी हा नफा अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे गुंतवणूकदारांना वाटते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.