रेडा -पुणे व मुंबई भागातून नागरिक पास काढून इंदापुर तालुक्यात येत आहेत. मात्र यापुढे जे नागरिक बाहेरून प्रवास करून इंदापूर तालुक्यात येतील, त्यांना तब्बल 14 दिवस गावातील प्राथमिक शाळेत 14 क्वारंटाइन करण्यात येणार आहे, त्यांची व्यवस्था चोख करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापुर येथील तहसील कार्यालयात राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील आरोग्य विभाग, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समितीचे सर्व विभाग तसेच इंदापुर नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्याच्या हद्दीमध्ये पाहुणे, नातलग यांची वर्दळ तालुक्यात होताना दिसत आहे. मात्र शेजारी शासकीय यंत्रणेतून पास घेऊन तालुक्याच्या हद्दीत मुक्काम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गावातील प्राथमिक शाळेमध्ये 14 दिवस देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.
तो जवळचा, हा आमचा हा निकष न बघता सर्रास हा नियम लागू करण्यात आला आहे. तालुक्याच्या कोणत्याही गावात, शेजारी नवीन नागरिक आल्यास तात्काळ प्रशासनाला गावकऱ्यांनी कळवून सहकार्य करावे, असे त्यांनी केले आहे. याप्रसंगी तहसीलदार सोनाली मेटकरी, वैद्यकीय अधीक्षक राजेश मोरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी आपल्याकडील अहवालाचे वाचन केले.
इंदापुरात तीन चाचणी सेंटरला परवानगी
इंदापुर तालुक्यामध्ये तीन ठिकाणी करोना चाचणी सेंटरला परवानगी मिळाली आहे. हे सेंटर काही दिवसांतच सुरू होतील, अशी माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली. लवकरच तालुक्यात चाचणी सेंटर उघडले जाणार असल्याने व रुग्ण आढळल्यास त्यांची त्वरीत चाचणी होऊन तो जर पॉझिटिव्ह आढळला तर कडक उपाययोजनांसाठी प्रशासनास हालचाली करता येणार आहे.