येरवडा(प्रतिनिधी) – येरवडा येथे शनिवारी पहाटे एका गर्भवती महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्या,होत्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाशी तसेच इतर यंत्रणेशी संपर्क करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. ऐनवेळी नगरसेविका व तिच्या पतीने वेळेवर आपल्या खासगी वाहनातून महिलेला रुग्णालयात पोहचविल्याने या महिलेची प्रसूती सुखरूप झाली. मात्र यामुळे महापालिकेचा नियोजनशून्य कारभार पाहावयास मिळाला आहे.
जय जवाननगर येथील सुनंदा गजभिये या गर्भवती महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्या होत्या. परंतु रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे मोठा प्रसंग निर्माण झाला होता. स्थानिक नगरसेविका श्वेता चव्हाण यांनी महापालिका यंत्रणेशी संपर्क करून देखील रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अशावेळी पती अनिल उर्फ श्री चव्हाण यांच्या मदतीने गर्भवती महिलेला तात्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले. वेळेत रुग्णालयात पोहोचल्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात गर्भवती महिला सुखरूप बाळंतीन होऊन तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. शुक्रवारीच महापौर मुरलीधर मोहोळतसेच अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांनी येरवड्यातील कोरोना आजाराच्या वाढत्या संख्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. येरवड्यातील भागातील गर्भवती महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे नगरसेविका श्वेता चव्हाण यांनी महापौर व प्रशासनाच्या निदर्शनास बैठकीतआणून दिले होते.
महापालिकेच्या या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे गर्भवती महिला अथवा एखाद्या गंभीर रुग्णाला वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास त्याला आ जीव गमवावा लागू शकतो. परंतु महापालिका आरोग्य विभाग याबाबतीत दिरंगाई करत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रुग्णवाहिका उपलब्ध नसताना देखील स्वतःच्या खाजगी वाहनातून नगरसेविका श्वेता चव्हाण व त्यांचे पती अनिल चव्हाण यांनी सुनंदा गजभिये यांना रुग्णालयात वेळेत पोहोचवल्यामुळे त्यांची सुखरूप प्रसूती झाली. नगरसेविका श्वेता चव्हाण व त्यांचे पती यांनी केलेल्या बहुमोल सहकार्यामुळेच सुखरूप प्रसूती झालेल्या गजभिये दांपत्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. येरवडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये सध्या दोन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. कोरोना रुग्णासाठी एक व इतर रुग्णांसाठी दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र या रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याची
नागरिकांची तक्रार आहे. महापालिका प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका श्वेता चव्हाण यांनी महापालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे केली आहे.
पुणे महापालिका तसेच इमर्जन्सी मेडिकल सर्विसेस(108) साठी उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिका शहरात सध्या वेळेवर उपलब्ध होत नाहीत .महापालिका प्रशासन तसेच आरोग्य विभाग या बाबतीत कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. कंटेनमेंट झोनमधील दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी परिसरात नागरिक त्यांची खाजगी वाहने बाहेर काढू शकत नाहीत. तसेच रुग्णवाहिका देखील आत येऊ शकत
नाही. या परिसरात रिक्षा किंवा मिनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ नोंद घेऊन मिनी रुग्णवाहिका तसेच स्थानिक काही रिक्षांना परवानगी घेऊन उपलब्ध केल्यास स्थानिक रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत होईल. येरवडा परिसरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव असेपर्यंत आपले वाहन हे नागरिकांसाठी अत्यावश्यक वाहन असेल ज्या कोणालाही आजारी पेशंटला रुग्णालयात जायचे असेल त्याने आपल्याशी साधावा असे आवाहन अनिल उर्फ चव्हाण यांनी केले आहे