पारनेर -पारनेर येथे ग्रामीण रुग्णालयात 40 बेडचे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. या रुग्णालयास आ. नीलेश यांके यांनी नुकतीच भेट दिली. तसेच रुग्णांशी संवाद साधला.
यावेळी रुग्णांसाठी मालेगाव पॅटर्नप्रमाणे डॉक्टर उज्ज्वल कापडणीस यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या म्युझिकल योगा व राजयोग मेडिटेशन वर्गाचे लंके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पारनेर येथे कोविड हॉस्पिटलमध्ये 18 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
पारनेर तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांचे तालुक्यातच उपचार व्हावेत व त्यांना येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पारनेर येथील खासगी डॉक्टरांच्या मदतीने या हॉस्पिटलमध्ये बेड व अद्यावत सेवांची उपलब्धता करण्यात आली आहे. आ. लंके यांनी पीपीई किट घालून या रुग्णांची भेट घेतली. तसेच त्यांना मानसिक आधार दिला. ते म्हणाले, मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे.
माझ्या कुटुंबातील एकाही रुग्णांची हाल होणार नाही. यासाठी मी व सर्व प्रशासन जबाबदारीने काम करीत आहोत, असेही ते म्हणाले. तहसीलदार ज्योती देवरे म्हणाल्या, शारीरिक स्वास्थ्य व मानसिक आरोग्य दोन्ही आघाड्यावर हे आरोग्य केंद्र काम करणार आहे.
येथे रुग्णांना व्यवस्थित दिली जात आहे. त्यांना म्युझिकल योगाच्या माध्यमातून तणावातून मुक्तता मिळेल.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, गटविकास अधिकारी किशोर माने, सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, डॉ. मनीषा उंद्रे, डॉ. बागल, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. संदीप औटी, डॉ. अजित लंके, डॉ. प्रदीप पुजारी, डॉ. नरेंद्र मुळे, योगा शिक्षिका राजराजेश्वरी कोठावळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, आरोग्याधिकारी उपस्थित होते.