जयपूर -राजस्थानशी संबंधित राजकीय घडामोडींबाबतचा फैसला उद्या (मंगळवार) उच्च न्यायालयाकडून दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचेच लक्ष लागणार आहे.
राजस्थानमधील सत्तारूढ कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या बंडामुळे राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. सत्तासंघर्ष सुरू झाल्यावर पायलट आणि त्यांचे समर्थक असणाऱ्या 18 आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या.
विधानसभेच्या सभापतींनी बजावलेल्या त्या नोटिसांना आव्हान देत पायलट आणि समर्थकांनी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सोमवारी झालेली सुनावणी अपूर्ण राहिली. आता उद्या सुनावणीनंतर न्यायालयाकडून निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.
सभापतींनी मंगळवारी सायंकाळी 5.30 पर्यंत नोटिसांवर निर्णय न घेण्याची ग्वाही याआधीच न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे सभापतींच्या निर्णयाबाबतही उत्सुकता आहे.