भ्रष्टाचार, अरेरावीचे धोरण मोडण्याचा संकल्प – आमदार जगताप
सासवड – पुरंदर तालुक्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, अरेरावीचे धोरण, अकार्यक्षमता विरोधात दि. 3 जुलैपासून पुरंदर-हवेलीचे आमदार संजय चंदूकाका जगताप सासवड येथील शिवतीर्थावर उपोषणाला बसणार आहेत.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरीक, शेतकरी, व्यावसायिक आदी ज्यांच्या महावितरणबाबत काही तक्रारी, अडचणी असल्यास त्यांनी पुरंदर कॉंग्रेसीच्या कार्यालयात तसेच माझ्या कार्यालयात लेखी स्वरूपात अडचणी मांडाव्यात तसेच हे आंदोलन कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचे नसून महावितरणकडून त्रास होत असलेल्या प्रत्येक घटकासाठी असल्याने या जनआक्रोश आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले आहे.
महावितरणच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराविरोधात आमदार संजय जगताप यांनी जन आंदोलन छेडत थेट उपोषणाचा मार्ग निवडला आहे. याबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी (दि. 29) शेतकरी आणि नागरिकांसोबत नियोजनाची बैठक झाली.
यामध्ये आमदार संजय जगताप यांनी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना महावितरणच्या बाबत असलेल्या अडचणी मांडण्याचे आवाहन करीत याबाबत सर्वसामान्यांपर्यंत पोहचून त्यांच्या जास्तीत जास्त अडचणी समोर याव्यात यासाठी जनजागृती करण्याबाबत सूचना दिल्या.