पावसामुळे रस्ता निसरडा ;अपघाताचे प्रमाण वाढले
मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव-निरगुडसर गावादरम्यान पारगावच्या हद्दीत रस्त्याचे काम सुरू असले तरी पाऊस सुरू झाल्याने चिखलाची दलदल होऊन रस्ता निसरडा झाला आनहे. यामुळे दुचाकी वाहने घसरून वाहन चालक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित काम पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
पारगाव (ता. आंबेगाव) ते निरगुडसर रस्त्यावरील पठारवस्ती येथे रस्त्याचे काम सुरू असून पावसामुळे येथे चिखलाची दलदल झाली आहे. यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. गेले दोन-तीन दिवसात या ठिकाणी अनेक दुचाकी घसरून पडल्याने किरकोळ अपघात झाले आहे.
पारगाव ते निरगुडसर रस्त्यावरील पठारवस्ती येथील पाण्याच्या टाकीजवळ सुमारे अर्धा किलोमीटरच्या रस्त्याला तीव्र चढ-उतार असल्याने रस्त्या खोदून चढ कमी करण्यात आला आहे. एका महिन्यापूर्वी या कामाला सुरुवात झाली असून या ठिकाणी रस्त्यावर मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.
दरम्यान, या ठिकाणी गेल्या दोन दिवसांत अनेक मोटारसायकली घसरून पडल्याने किरकोळ अपघात झाले आहेत. निरगुडसर येथील एक तरुण या ठिकाणी पडून जखमी झाला आहे तर पारगाव येथील अनेक दुचाकीस्वार येथे घसरले आहेत. तसेच अनेक जायबंदी झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.