अवसरीत सभागृह बांधणीसाठी 14 कोटी मंजूर
मंचर -अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी आणि शासकीय तंत्रनिकेतन या दोन्ही संस्थांसाठी एकत्रित सभागृह बांधणीसाठी 14 कोटी 95 लक्ष 72 हजार रुपये मंजुर झाले आहेत.त्या माध्यमातुन सर्व सुविधायुक्त सभागृह उभारले जाईल.अशी माहिती कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. तेथे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येते, त्यासाठी तेथे सुसज्ज सभागृहाची गरज ओळखून त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रस्ताव मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार विभागाने तयार केला होता.
या प्रस्तावास शुक्रवारी (दि. 28) सरकारने मान्यता दिली. शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय या संकुलामध्ये 14 कोटी 95 लक्ष 72 हजार रुपये इतक्या रकमेच्या सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे, त्यामुळे दोन्ही संस्थांतील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. त्याबद्दल महाविद्यालय आणि ग्रामस्थांनी मंत्री वळसे पाटील यांचे आभार मानले.