पुणे – राज्यात काही प्रमाणात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, शहरातही काही प्रमाणात थंडी जाणवत आहे. दरम्यान, हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार, गेल्या आठवडाभरापासून शहरातील किमान तापमानात घट होत असल्याने, शहरात थंडीची चाहूल जाणवत आहे.
उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील वातावरणावर होऊ लागला आहे. हवामान कोरडे असल्याने विदर्भाच्या पूर्व भागात थंडीने पुन्हा जम बसविला आहे. त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही हवामान कोरडे असल्याने काही प्रमाणात गारठा वाढला आहे.
शहरातही पहाटे आणि सायंकाळी थंडी जाणवत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मंगळवारी शहरात कमाल तापमान 30.7 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
दरम्यान, शहरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील. तर राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.