पुणे : सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. ( CM Uddhav Thackeray on Serum Institute Fire )
सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्टिट्यूटच्या टीमशी त्यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण जगात कोविडचे संकट अद्याप संपलेले नाही. गेल्या आठवड्यात सिरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झाला. लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली ही बातमी आली आणि क्षणभर केवळ आपल्याच नाही तर सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. दुर्दैवाने या दुर्घटनेत पाच कामगार मृत्युमुखी पडले. लस बनवली जाते ते केंद्र, साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, काल आगीचे वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेत, वरील दोन मजले जिथे नवे केंद्र सुरू केले जाणार होते, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. मात्र, सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल.
मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सिरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन निश्चित मदत करेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.