करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने झाला महोत्सव
पिंपरी – चिंचवडगाव येथील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाची सोमवारी (दि. 4) धुपारतीने सांगता झाली. प्रथम मोरया गोसावी समाधी मंदिर आणि त्यानंतर मंगलमूर्ती वाड्यात ही धुपारती करण्यात आली. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.
मोरया गोसावी संजीवन समाधीची आज पहाटे चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, चंद्रशेखर रबडे गुरूजी यांच्या हस्ते महापूजा झाली. सकाळी 7:30 च्या सुमारास ड्रोनद्वारे मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी मंदार महाराज देव यांच्यासह विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, ऍड. राजेंद्र उमाप, विनोद पवार आणि काही वारकरी उपस्थित होते.
मंदिर परिसरातील श्री. नयन भारती गोसावी समाधीसमोर श्री मोरया गोसावी चरित्र पठण करण्यात आले. चिंचवडगावातील महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिरात महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा कीर्तनकार सतीश महाराज काळजे यांनी काल्याचे कीर्तन सादर केले. दुपारी मंगलमूर्ती वाड्यात मंत्रजागर झाला. सहाय्यक कारभारी महेश पाटसकर उपस्थित होते.
1 ते 4 जानेवारी या कालावधीत करोनामुळे झालेल्या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद वाटप रद्द करण्यात आले. केवळ धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच, करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मंदिर परिसराजवळ जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये पासधारकांशिवाय अन्य नागरिकांना प्रवेश देण्यात आला नाही.
376 जणांची मोफत नेत्र तपासणी
मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये 376 जणांची तपासणी करण्यात आली. तर, आर्थिक दुर्बल घटकातील 217 लोकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. महोत्सवात नगरसेविका अश्विनी चिंचवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या माध्यमातून हे शिबिर घेण्यात आले. 2004 पासून अखंडपणे हे शिबिर सुरू आहे. यंदा करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत देखील शिबिर पार पडले.